संचालकांविरुद्ध कारवाईसाठी स्वाक्षरी मोहीम

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटी, रविवारी होणार आमसभा

चंद्रपूर : जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीतील जमीन खरेदीप्रकरणानंतर आता नवनवीन घोळ समोर येत आहे. गरज नसतानाही संचालक मंडळाने पदभरतीची प्रक्रिया राबविली. कोरोनाकाळात घेतलेल्या आनलाइन सभेवर मोठा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. संचालकांकडून करण्यात आलेल्या या घोळाविरोधात कर्मचारी आता पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. २३) स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. यात दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली. याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या सदस्यांच्या तक्रारी आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने अध्यक्षांनी सोसायटीच्या काही सदस्यांना चर्चेसाठी बोलविले. त्यावेळी अध्यक्षांनी यावर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलविली आहे. त्यात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, सभेत्या कार्यवृत्ताची प्रत मागितली असता सभा तहकूब झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे संचालक मंडळ सदस्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप सचिन मुरकुटे यांनी केला आहे. दरम्यान, संचालकांची पोलिस तक्रार करण्याच्या अनुशंगाने कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम गुरुवारपासून सुरू केली. त्यावर दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कोरोना काळात सहकारी संस्थांच्या आमसभा ऑनलाइन घेण्याचे निर्देश होते. जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीची गतवर्षी ऑनलाइन आमसभा पार पडली. या सभेवर बारा लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. हा खर्चही नियमबाह्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

जमीन खरेदीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी २१ सप्टेंबरला आपण काही सदस्यांना बोलविले होते. यावेळी झालेल्या चर्चेत बराच वेळ निघून गेला. उशीर झाल्याने संचालक मंडळाने विशेष सभा घेतली नाही. ती रद्द करावी लागली.
अजय डोर्लीकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी क्रे़डिट सोसायटी चंद्रपूर