चंद्रपूर : बल्लारपूर येथे हवेतुन ऑक्सीजन घेणारा प्लॅन्ट त्वरीत उभारण्यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना लेखी पत्र पाठविले असुन त्यांच्याशी चर्चा सुध्दा केलेली आहे. चंद्रपूर जिल्हयात कोरोनाची रूग्णसंख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. परिणामी म़त्युचा दर सुध्दा वाढत आहे. रूग्णांचे तसेच म़त्युचे आकडे चिंता वाढविणारे आहे. रूग्णांना बेडस्, इंजेक्शन्स व औषधी वेळेवर उपलब्ध्ा होत नसल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडसची समस्या ही प्रमुख समस्या झाली आहे. ऑक्सीजनचा योग्य पुरवठा होत नसल्याने ही समस्या अधिक बिकट होत चालली आहे.
कोल्हापूरमध्ये असा प्लॅन्ट उभा करण्यात आला आहे. या प्लॅन्टचे वैशिष्टय हे आहे की, हवेतुन हा प्लॅन्ट ऑक्सीजन घेतो, आपल्याला ऑक्सीजन रिफीलींग करण्याची गरज नाही व तसेच आपल्याला लिक्वीड ऑक्सीजन आणण्याची गरज नाही. कोरोनाचे संकट लक्षात घेवून स्थायी स्वरूपामध्ये अनेक वर्षे हा ऑक्सीजन प्लॅन्ट कामी येवू शकतो. या प्लॅन्टचे आयुष्य 30 वर्षे सांगीतले गेले आहे. कोरोनाचे संकट जर दिर्घकाळ राहीले तर हा प्लॅन्ट दिर्घकाळ कामी येईल. या प्लॅन्टच्या माध्यमातुन रूग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सीजनचा पुरवठा करता येईल असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असुन त्यांनी सुध्दा जिल्हा प्रशासनाला याबाबत सुचना दिल्या असल्याबाबत आपणास माहिती दिल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.