अप्पर पोलीस अधीक्षकांची पडोली येथील त्रिमुर्ती ढाब्यावर धाड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : येथे नव्यानेच रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकणी यांनी पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार एम. एम. कासार यांच्यासह पडोली येथील त्रिमुर्ती ढाब्यावर धाड टाकली. या कारवाईत विदेशी दारुसह ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ढाब्याचे मालक मनोहर पिसे यास अटक करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले.

शहरालगत असलेल्या पडोली येथील त्रिमूर्ती ढाब्यावर मोठ्या प्रमाणात दारुची अवैध विक्री होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार एम. एम. कासार यांच्यासह त्यांच्या सहकार्याला घेऊन ढाब्यावर धाड टाकली. यावेळी ढाब्याची व त्याच्या घराची तपासणी केली असता, बी सेवन कंपनीची ३० बॉटल्स, नंबर १ कंपनीच्या ३८ बॉटल्स, देशी दारुच्या २५२ बॉटल्स आढळून आल्या. पोलिसांनी सर्व दारुसाठा जप्त करुन ढाबामालकाला अटक केली. अप्पर पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा अवैध दारू तस्करी करणाऱ्या माफिया विरोधात कारवाई करीत असताना शहरातील पडोली येथे अनेक वर्षांपासून त्रिमूर्ती ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू होती मात्र याची कल्पना स्थानिक गुन्हे शाखेला नव्हती म्हणजे ही जणू आश्चर्याची बाबचं म्हणावी लागेल.