मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
या शयरीतल्या ओळी बराच काही आपल्या आयुष्यात सांगून जातात. कोणत्याही कार्याची सुरवात करताना कोण काय म्हणेल, साथ देईल कि नाही याचा कधी विचार करायचा नसतो स्वतः पासून सुरवात करायला हवी, हे आपल्याला अनेक लोकचळवळीतून पाहावयास मिळते. अनेकदा समाजकार्यत छोटासा उपक्रम नंतर एक लोकचळवळ बनते.
त्याच धर्तीवर चंद्रपूर येथे देखील असा उपक्रम सुरु झाला परंतु त्याच रूपांतर आता हळू हळू लोकचळवळीत होत आहे. असाच एक उपक्रम चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे, त्याच नाव आहे ‘मदतीचा एक घास’.
कोरोना काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांना अर्धपोटी उपाशी रहावं लागत आहे. तर काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी काँग्रेसच्या महिला प्रदेश काँग्रेसने ‘मदतीचा एक घास’ ही मोहीम राबवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ही मोहीम सुरू केली. त्यांनी या मोहिमेत नुसता भाग घेतला नाही, तर स्वत: पोळ्या लाटून इतर महिलांनाही या उपक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहित केलं या उपक्रमांतर्गत गरजूंना घरचे जेवण दिलं जातंय. त्यासाठी महिलांनी घरी रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पावभर भाजीही जास्त करायची. हे सर्व अन्न एकत्र करून एखाद्या संस्थेला दिलं जातं किंवा महिला काँग्रेसच्या बॅनरखाली गरजूंना दिलं जातंय.
आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी देखील या उपक्रमाची सुरवात जिल्हा सामान्य रुग्णालयात केली. चंद्रपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात काही बोटावर मोजणाऱ्या महिलांना घेऊन त्यांनी या उपक्रमाची सुरवात केली. आता अनेक महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहे.अनेक समाजसेवी संस्थांनी सुद्धा यात आता हातभार लावायला सुरवात केली आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचा व त्याच प्रमाणे इतरीही रुगांचे नातेवाईक, कर्मचारी यांचा आता भुकेच्या प्रश्न मिटला आहे.
मी आज सहज येथे उपक्रम बघण्याकरिता गेलेलो होतो. त्यावेळी प्रत्यक्ष नातेवाईकांशी संवाद साधला. त्यातील अनेकांनी या महिलांकडील जेवण उत्कृष्ठ असते त्याचबरोबर या महिला आमची विचारपूस देखील करतात अशा प्रतिक्रिया दिल्या.
अनेक नातेवाईक हे गाव खेड्यातून, जिल्ह्यातील, जिल्ह्या बाहेरील किंबहुना राज्य बाहेरील होते. अनेक दिवसा पासून ते रुग्णाच्या उपचाराकरिता येथे आहेत. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील लॉक डाऊन मुळे सर्व हॉटेल्स व उपहारगृह देखील बंद आहे. कोरोना ग्रस्त लोकांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयाच्या आवारात वाट बघत असतात. त्यांचे जेवणासाठी हाल होत असते, परंतु ‘मदतीचा एक घास’ मुळे आता या सगळ्यांना सहज सुलभ रोज दुपारी बारा वाजता जेवण मिळत आहे.
फक्त सोपस्कार किंवा पक्षाचा आदेश म्हणून हे अभियान या महिलांनी राबवले नाही,तर त्यात त्यानी आपल्या हाताने जेवण करून आणून सेवाभाव जोपासला. अनेकांनी तर या उपक्रमात येऊन जेवण गरजूंना देऊन आपले लग्नाचे वाढदिवस साजरे केले. आशा उपक्रमात लोक तेव्हाच जुळतात,जेव्हा उपक्रम राबवणारे लोक मनापासून सेवाभाव दाखवतात. त्यामुळे हा आता एक उपक्रम न राहता त्याला लोकसहभागाची जोड मिळाली आहे.,त्यामुळे आज अनेक महिलाच नाहीतर, पुरुष देखील या उपक्रमात सहकार्य करतात.
रोज नवीन नवीन लोक येतात आणि गरजूंना जेवण देतात. हा उपक्रम राबवणाऱ्या महिलांशी जर बोललो आपण तर लक्षात येते इथे कोणी नेता नाही सगळे मिळून सहकार्य करतात, इतका सुसंवाद बघायला मिळणे आजकाल कठीण झाले आहेत.
या आधी पण जिल्हा सामान्य रुग्णालयात गरजूंना जेवण वाटण्यात आले पण महिलांनी कंबर कसून असा भाग कधी घेतला नाही, स्वतः अन्नपूर्णा असलेली महिला जेव्हा अन्नदानाचे कार्य हाती घेते तेव्हा त्याला वेगळं स्वरूप प्राप्त होते. ते या उपक्रमात आपल्याला बघायला मिळते.