ट्विटरचा माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनाच झटका, रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट केलं लॉक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नवी दिल्ली : नवीन नियमावलीवरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्षाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कापीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यासंदर्भात ब्लॉक करण्यात आलं होतं. या संदर्भात खुद्द रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली.

एका तासानंतर अकाऊंट सुरु झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी अकाऊंट लॉक असताना आणि अनलॉक करण्यात आल्यानंतरचे स्क्रीन शॉट शेअर करत ट्विटरवर आरोप केले आहेत.

रविशंकर प्रसाद आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज अत्यंत विचित्र काहीतरी घडले. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानुसार ट्विटरने जवळजवळ आपल्याला एका तासासाठी लॉगीन करण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर जवळपास एका तासानंतर त्यांनी खातं अनलॉक केल्यानंतर लॉगीन करता आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा 2021च्या नियम 4(8) चं उल्लंघन करते. ट्विटरनं माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.

दरम्यान ट्विटरनं केलेली कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या बाजून नसल्याचं समोर आलं आहे. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा असल्याचं दिसून आलं आहे, असा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला.