वणी : तालुक्यातील रासा येथून प्रतिबंधित तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. बनावट प्रतिबंधित तंबाखूचा अवैध पुरवठा करणारा या प्रकरणी प्रमुख आरोपी आहे. ठाणेदार वैभव जाधव यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शनिवार दि.24 एप्रिल ला धाडसत्र अवलंबत तब्बल 14 लाख 55 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिपक महादेव खाडे (27) रा. रासा, दिपक कवडू चावला (40) रा. महादेव नगरी तर वसीम रा चंद्रपुर असे गुन्हा नोंद झालेल्या संशयीत आरोपीची नावे आहेत. ‘निकोटिन’ ची लत लागलेल्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याकरिता वणी शहरात मागील काही कालखंडात तंबाखू साम्राट उदयास आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली टाळेबंदी, अशा बाहद्दराच्या फायद्याची ठरताना दिसत आहे. राज्यात सुगंधित तंबाखू व सुपारीवर बंदी लादण्यात आली आहे. यामुळेच वाढलेली मागणी लक्षात घेता बनावट तंबाखूचा पर्याय शहरात काहींनी निवडला आहे.
ठाणेदार वैभव जाधव यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी तालुक्यातील रासा येथे धाडसत्र अवलंबत खाडे याचे घरा समोर उभ्या असलेल्या टाटा एस वाहन क्रमांक एम. एच. 29 ए. टी 0885 ची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक दीपक खाडे याला विचारणा केली असता वणीतील चावला याचा माल असल्याची कबुली दिली. तर सदर प्रतिबंधित तंबाखू चंद्रपूर यरथील वसीम नामक व्यक्तीकडून आणल्याचे स्पष्ट केले. यावेळी पाढरे रंगाचे गोणीत एकूण मजा 108 चे 50 ग्राम वजनाचे 800 डब्बे, ईगल हुक्का शिशा तयाखू पॉकीट 480 पाकीट, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु चे 720 डब्बे असा 9 लाख 55 हजार 600 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 14 लाख 55 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर खाडे आणि चावला या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 188, 269, 270, 271, 272, 273, भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, गोपाळ जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक अंडर्सवार, प्रगती काकडे यांनी केली.
” दीपक की रोशनी मे काले धंदे”
बनावट तंबाखू चा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपक चावला याचेवर बनावट तंबाखू प्रकरणी जानेवारीत गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” ही म्हण तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. टाळेबंदीत संधीचे सोने करण्याची सवय जडली आहे. यामुळेच येनकेन प्रकारे त्याचा असा उपद्व्याप सुरू असतो हे पुन्हा उघड झाले आहे.