यवतमाळ : मजुरीचे पैसे घेण्यासाठी शेतात जात असलेल्या ४५ वर्षीय महिलेला नराधमांनी एकट्यात गाठून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हेतर या अत्याचाराचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर या प्रकरणात १८ दिवसांनी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात एका आरोपीला अटकही झाली आहे.
दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे राहणाऱ्या महिलेचे सुनेसोबत वाद झाले. रागाच्या भरात ती भावाच्या गावाकडे जाण्यास निघाली. मात्र तिकीटासाठी पैसे नसल्याने ते पैसे घेण्यासाठी डेहणी शिवारातील शेतात जात होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आराेपी प्रल्हाद आठवले (३९) रा.कलगाव याने बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. याचे विधीसंघर्षग्रस्त बालकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. नंतर आकीब खाॅ वाजीद खाॅ याने महिलेवर अत्याचार केला. यावेळी महिलेला पोलिसात तक्रार करशील तर तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून जीवाने ठार केले जाईल, अशी धमकी आरोपींनी दिली. कशीबशी महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली.
या गंभीर प्रकाराने घाबरलेल्या महिलेने तिच्या आजीकडे सावंगा (ता.दिग्रस) येथे आश्रय घेतला. भीतीपोटी झालेली अत्याचाराची घटना कुणालाच सांगितली नाही. मात्र आरोपींनी तो अश्लील व्हिडीओ मोबाईलवर व्हायरल केला. त्यामुळे सदर महिलेच्या पतीला ही घटना माहीत झाली. त्याने याबाबत पत्नीकडे विचारणा केली. तेव्हा तिने ६ मे रोजी झालेली आपबिती सांगितली. दिग्रस तालुक्यातील घटना असली तरी घटनास्थळ आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.
आर्णी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अमोल प्रल्हाद आठवले (३९), आकीब खाॅ वाजीद खाॅ (२०) दोघेही रा.कलगाव व विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अमोल प्रल्हाद आठवले याला सोमवारीच अटक करून पोलीस कोठडीची मागणी केली आहे.