कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावकरी लावताहेत काटेरी कुंपण!

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बोडधा गावात कोरोनाचा शिरकाव नाहीच
• भविष्यातही होवू देणार नाही, गावकारभा-यांचा निर्धार

चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढतो आहे. नागरिकांमध्ये भितीमय वातावरण पसरले आहे. वर्दळीचे आणि मोचठ्या शहरांमध्ये कोरोनाविषाणूने चांगलेच पाय पसरले आहे. जिल्ह्यातील बाधित आणि मृत्यूची संख्या चिंतेचा विषय ठरते आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुके पंधरवाड्यापासून कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेले आहेत. त्याला चिमूर तालुका अपवाद नाही.

शहरांसोबत गावांतही संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावाचे कारभारी पुढे येवून नवनविन क्लुप्त्या आखत आहेत. चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून 17 किमी वरील बोडधा गावातील प्रमुख रस्त्यावर काटेरी कुंपण लावून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंदीकरीत आहेत.
गतवर्षी शहरी भागामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या आजाराने ग्रामीण भागात प्रवेश केला असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

काही गावांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या भयभीत करणारी आहे. असे असतांना सुद्धा काही गावांमध्ये अजून पर्यंत कोरोना ने सिरकाव केलेला नाही किंवा ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले नाही त्या गावात गावकऱ्यांनी स्वतःचं गावाच्या रक्षणासाठी जबाबदारी घेतलेली आहे. याच अनुषंगाने चिमूर तालुक्यातील बोडधा या गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण लावण्यात आले आहे. या गावांमध्ये इतरेत्र कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कामे वगळता इतर गावचे व्यक्ती या गावांमध्ये दिसल्यास ग्रामपंचायतद्वारे पाचशे रुपये दंड आकारल्या जातो. या गावात घेतलेला हा निर्णय सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सध्या चांगले आहे.
1300 लोकसंख्या असलेल्या बोडधा गावात सरपंच म्हणून रोशनी बारसागडे तर पोलिस पाटील पदाची जबाबदारी प्रफुल बरधे यांचेकडे आहे.

त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान तर त्याच्या पुढे आहेच. या गावाचे लसीकरण केंद्र 7 किमीवरील जांभूळघाट येथे आहे. सध्या गावात एकही कोरोनाचा रूग्ण नाही. भविष्यातही लोकांना संसर्ग होणार नाही, अशा आशावाद गावकारभा-यांच्या कृतीतून दिसून येत आहे. शासन-प्रशासन करो कि न करो मात्र गावकरी स्व:तच पुढे येऊन गावाच्या शिवेवरच कोरोनाला रोखत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.