चंद्रपुरात भाजप सरकारने केलेली दारूबंदी महाविकास आघाडी सरकारने उठविली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

श्रमिक एल्गारच्या ॲड. पारोमीता गोस्वामी यांच्या नेतृत्वात झाले होते दारूबंदीसाठी आंदोलन

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी श्रमिक एल्गारच्या ॲड. पारोमीता गोस्वामी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांनी दारूबंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. मात्र, या अहवालावर मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमची सरकार आल्यास चंद्रपुरात दारूबंदी करू असा शब्द दिला होता. निवडणुकीत भाजपचे सरकार निवडून आले आणि चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली. तो दिवस होता १ एप्रिल २०१५ चा. मात्र, विद्यमान सरकारने ही बंदी गुरुवारी उठल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र, बंदीची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. शहरापासून खेड्यापर्यंत खुलेआमपणे दारूविक्री सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी सतत जोर धरत होती. राज्य सरकारने दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय, अभ्यास करून शासनास शिफारस प्राप्त करण्यासाठी सेवानिवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीने महिनाभरात राज्य सरकारला अहवाल सादर करेल. त्यानंतर दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबरला बैठक पार पडली होती. बैठकीत जिल्ह्यात २०१५ पासून लागू करण्यात केलेली दारूबंदी उठविण्यासंदर्भात प्राप्त मागण्यांच्या अनुषंगाने सर्वंकष विचारविनिमय करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासनास शिफारस करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते.

समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जात होती. यामध्ये बनावट दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंबंधी गठित केलेल्या समितीने दिलेला अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. त्यावर चर्चा न होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. अनेक लोक डुप्लीकेट दारूच्या व्यवसायात गुंतले होते. धक्कादायक म्हणजे बाया आणि लहान मुलही या व्यवसायात गुंतली होती. पुरवठा पर्याप्त होत नसल्यामुळे ड्रग्जचीही विक्री चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे समितीच्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.