भाजपने बहुजन नेत्यांचा बळी का घेतला हे पण सांगावे : रोहिणी खडसे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भारतीय जनता पक्षाने आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलन केले. त्यावर एकनाथ खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे हे चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मुंडे, तावडे आणि खडसे यांचे बळी का घेतले यावरही त्यांनी यानिमित्ताने भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपने आजचे आंदोलन केवळ राजकारणासाठीच केले आहे. फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचा आदेश काढल्यानंतर केंद्राने राज्याकडे इम्पीरिअल डाटा मागितला होता. तो मिळाला नाही, तेव्हाच अध्यादेशाद्वारे कायद्यात बदल करून दिलेले आरक्षण टिकणार नाही याची फडणवीस यांना माहिती व्हायला हवी होती, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्या प्रकरणात राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. त्यावर रोहिणी खडसे यांनी ट्‌विटरवर हे प्रतिपादन केले आहे. ओबीसी आरक्षण या विषयावरून फडणवीस आणि भाजपला रोहिणी खडसे यांच्याकडून प्रथमच इतके टोकदार सवाल करण्यात आले आहेत.