भाजपचे शहराध्यक्ष डॉ. गुलवाडेंवर ४२ लाखांचा परतावा

मनपाच्या लेखा परीक्षणात उघड ; कोविड रुग्णांकडून अतिरिक्त वसुली

चंद्रपूर : भाजपचे शहराध्यक्ष डॉ . मंगेश गुलवाडे यांनी कोविड रुग्णांकडून जादा वसुली केल्याचे मनपाच्या लेखा परीक्षणातून उघड झाले आहे. त्यांच्याकडून आता ४२ लाख २० हजार रुपयांची वसुली केली जाईल. रामनगर परिसरात डॉ. गुलवाडे यांनीखासगी कोविड रुग्णालय सुरु केले होते.

त्यांना चाळीस खाटांची परवानगी असताना ८० खाटांचे रुग्णालय सुरू केले. कोविडच्या काळात शासनाने कोविडच्या उपचारासाठी दर ठरवून दिले. राज्यभरात कोविड रुग्णांनाकडून अतिरिक्त वसुली केली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर कोविड रुग्णालयाचे आणि रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला . दरम्यानच्या काळात डॉ. गुलवाडे यांच्या रुग्णालयाविरोधात तक्रारीसुद्धा झाल्या.

त्यांच्या रुग्णालयाचे लेखापरीक्षण मनपाचे मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी यांनी केले. त्यात गुलवाडे यांनी रुग्णांकडून अतिरिक्त वसुली केल्याचे समोर आले. त्यांच्यावर ४२ लाख २० हजार रुपयांचा परतावा काढण्यात आला आहे. ही रक्कम रुग्णांना परत केली जाईल. डॉ. गुलवाडे हे भाजप आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहे. त्यामुळे डॉ. गुलवाडे यांनी नैतिकता स्वीकारून पदाचा राजीनामा द्याव, अशी मागणी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, अनु दहगावकर, शलिनी भगत यांनी केली.