18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळं काही ठिकाणी लसीकरणासाठी अडथळे येत आहेत. राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळं 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्यानं राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत लस मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्याप्रमाणं प्रत्येकाला लस मिळेल. तसच येत्या 6 महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

लसीकरण करण्यासाठी कोविन अॅपवरून नावनोंदणी करणं आवश्यक आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही. केंद्र सरकारचे तसे आदेशच आहेत, त्यामुळं लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. त्यामुळे सर्वांचंच लसीकरण होणं शक्य नाही. मात्र 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरूच राहील. या लसीकरणात कोणतीही बाधा येणार नसल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना लस उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात प्रत्येकी 10 लाख डोस मिळणार आहे. जुलैनंतर ते 20 लाख डोस देणार आहेत. कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळणार आहे. कंपनीने तसं तोंडी आश्वासन दिलं आहे. तर, ऑगस्ट दरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.