जिल्ह्याची दारूबंदी उठवल्याने मद्यविक्रेते आणि मद्यपींमध्ये खुशीचा माहाैल असला तरी या निर्णयामुळे नागपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील मद्यमाफियांना चांगलाच फटका बसणार आहे. नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपुरात दर आठवड्यात सुमारे दोन कोटींच्या मद्याची तस्करी केली जात होती, हे विशेष!
चंद्रपूर : अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुणवर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती.
मागील सरकारने दारू बंदी केली. मात्र अंमलबजावणी करू शकले नाही. तसेच आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारू येत होती. यामुळे समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. अडीच लाख निवेदन “दारू बंदी उठवा’ असे तर 30 हजार दारू बंदी कायम ठेवा या मागणीसाठी आली होती. त्यानंतर पुन्हा एक समिती स्थापन केली होती. जिल्ह्यात क्राईम वाढले होते.
महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. जनतेच्या सर्व घटकांसोबत बोलून झा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार दारू बंदी उठविली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.