सापाने गिळलेले चक्क कोंबडीचे दहा अंडे पुन्हा ओकले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मूल पासून जवळच असलेल्या लहान कोसंबी येेथे गव्हा—या सापाने कोंबडीचे चक्क् दहा अंडे गिळले.ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान येथे घडली. पकडण्यात आलेल्या सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

मूल पासून सहा किमी अंतरावर असलेल्या लहान कोसंबी येेथील पवन लोनबले यांच्या घरी रात्री साडे आठ वाजता गव्हा—या जातीच्या विषारी सापाने घरात प्रवेश केला. घराच्या एका कोप—यात पिल्ले फोडण्यासाठी मोठया टोपलीत कोंबडी अंडयावर बसली होती. सापाने थेट शिकारी वर बसलेल्या कोंबडीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. सापाला पाहताच कोंबडी भितीने पळाली. कोंबडीच्या फडफडण्याचा आवाज ऐकून लोनबले कुटुंबीयांनी धाव घेतली असता त्यांना चक्क सापाचे दर्शन झाले.त्यांनी लागलीच मूल येथील सर्पमित्र उमेश झिरे आणि तन्मय झिरे यांना माहिती दिली. सर्पमित्र येई पर्यंत सापाने कोंबडीच्या अकरा अंडया पैकी दहा अंडयावर ताव मारलेला होता.

तात्काळ दाखल झालेल्या तन्मय झिरे यांनी दहा अंडे गिळलेल्या आणि कोंबडीच्या शिकारीत बसलेल्या सापाला अलगद पकडले.त्यांनंतर सापाने गिळलेले दहा अंडे क्षणार्धात तोंडा वाटे बाहेर ओकले. पावसाळी वातावरणामुळे सापाने घरात प्रवेश केला आणि अंडयावर ताव मारला.अंडयांची नासाडी झाली असली तरी लोनबले यांची कोंबडी मात्र बचावली. सापाला पकडण्यात आल्याने लोनबले कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली. पकडण्यात आलेला गव्हा—या जातीचा विषारी साप साडे पाच फुटाचा होता. सापाची नोंद करून सर्पमित्र तन्मय झिरे यांनी सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडले.