महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर, 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 1 मे रोजी सकाळी 7 वाजता हा लॉकडाऊन संपणार होता.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन याच नियमावलीसह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
15 मे पर्यंत महाराष्ट्रात यापूर्वी जे नियम लागू करण्यात आले होते, तेच नियम लागू असणार आहेत. तसेच कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आटोकाट प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन काळामध्ये आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास ई-पास जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे.
लग्न समारंभासाठी पूर्वीप्रमाणेच 25 लोकांनाच उपस्थित राहण्याची मुभा राज्यभरात असणार आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याबरोबरच, अत्यावश्यक सेवेत काम करणारी व्यक्ती आणि अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे आता 1 तारखेला लॉकडाऊन उघडणार या आशेवर असणाऱ्या लोकांना 15 मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.