महापौर यांना पप्पू देशमुख यांचे जाहीर चर्चा करण्याचे आव्हान
चंद्रपूर : उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता.2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये सौ. राखी कंचर्लावार महापौर असताना सुमारे 200 कोटी रुपयांच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्यामुळे लेखापरीक्षकांनी 71 त्रुटींवर बोट ठेवलेले आहे.चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार याला प्रशासकीय बाब म्हणून जनतेची दिशाभूल करित आहेत व खोट बोलत आहेत. सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून आज जाणीवपूर्वक आमसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्याचे टाळले.तांत्रिक गोष्टीचा गैरफायदा घेऊन ऑनलाइन उपस्थित असलेल्या नगरसेवकांचा आवाज बंद केला व सभा आटोपती घेतली.
पहिल्या इनिंगप्रमाणेच महापौर राखी कंचर्लावार यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भोजन पुरवठा घोटाळा, डबा घोटाळा,कचरा घोटाळा,प्रसिद्धीच्या कामातील घोटाळा असे करोडो रुपयांचे मोठे घोटाळे झाले. त्यांच्या दोन्ही कारकिर्दीमध्ये प्रशासनाकडून करोडो रुपयांच्या कामात भ्रष्टाचार किंवा अनियमितता होणे हा योगायोग आहे का ? याचा अर्थ एक तर त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसावे किंवा त्यांनी प्रशासनासोबत संगनमत करून जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरुपयोग केला असावा.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत नैतिकतेच्या आधारावर महापौर राखी कंचलवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली.
अशाच प्रकारे देशाच्या महालेखा परीक्षक व नियंत्रक (कॅग) यांच्या अहवालावरून भाजपने तत्कालीन पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारविरुद्ध रान उठवले होते. जनतेने सुद्धा पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारला निवडणुकीत जागा दाखवली होती. ही बाब महानगरपालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावी.
लेखापरिक्षण अहवालावर महापौर राखी कंचलवार यांना नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जाहीर आव्हान दिले.महापौर म्हणतील ‘तेव्हा’ व ‘जिथे म्हणतील तिथे’ जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सत्य काय आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शहरात तिव्र पाणी टंचाई आहे.पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा मनपाने तयार केला नाही. केवळ 8 टॅन्कर च्या भरवशावर दररोज 150 ते 200 ट्रीप पाणीपुरवठा शक्य नाही. टॅन्करची संख्या वाढविली नाही.
रात्र-रात्रभर वाट पाहूनही लोकांना पाणी मिळत नाही.टॅन्कर साठी निधी नाही,मात्र प्रसिद्धीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणे व भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी खोटी प्रसिद्धी करणे याच गोष्टीला मनपातर्फे सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.