पाणीटंचाईच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करा : महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरातील ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे, अशा पाणीटंचाईच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार दिले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात सोमवारी (ता. ३१) पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त विशाल वाघ, सभागृह नेता संदीप आवारी,भाजपचे गटनेता वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, बसपचे गटनेता अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेता प्रदीप (पप्पू ) देशमुख, शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आदींसह आभासी माध्यमातून झोन सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.


सभागृहात सर्वप्रथम दिवंगत झोन सभापती अंकुश सावसाकडे, माजी पालकमंत्री एकनाथराव गायकवाड, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी स्वीकृत सदस्य अनिल त्रिवेदी, खासदार राजीव सातव यासह कोरोनामुळे मृत पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरातील भूजल पातळी घसरली आहे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे, अशा पाणीटंचाईच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय ज्या भागातून मागणी येईल, त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार दिले.