नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांच्याजवळून जातांना थांबला आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांत मिसळले तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आज दुपारी नागपूर दौऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी शाखा कालवा येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा काही अंतरावरील हेलिपॅडकडे जाण्यासाठी निघाला तेवढ्यात शेतकऱ्यांचा घोळका हातात कागद घेऊन थांबला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी वाहने थांबविण्याचे आदेश दिले व ते स्वत: झटकन गाडीतून उतरून जमलेल्या शेतकऱ्यांकडे गेले.
यावेळी शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून गोसीखुर्द धरणातील पाण्याचा एकही थेंब चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना न मिळाल्याने काहीच फायदा मिळत नसल्याची व्यथा मांडली, मोबदला मिळाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सर्वांशी बोलून आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले. मुख्यमंत्री स्वत: थांबून आपले म्हणणे ऐकून घेत आहेत यावर शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभारही मानले.