राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे
भंडारा : जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतांनाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी भंडारा येथे केली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटूंबियांसोबत संवाद साधला.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.