चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त मागणीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
9

• जिल्ह्याच्या 250 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक अराखडयास मंजुरी

• पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी 321 कोटींची अतिरिक्त मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा, वनपर्यंटन आहे. त्याचबरोबर खनिज संपत्ती मोठी आहे. वन्यजीवांपासून संरक्षण आणि जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्ह्याच्या ठरवलेल्या 180 कोटी 95 लक्ष रुपयांच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त 70 कोटी रुपये मंजूर करीत 250 कोटी रुपयांच्या आराखडयास मान्यता देत आहे. मात्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली 321 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार अभिजित वंजारी, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते.

यावर्षी राज्यात कोरोनामुळे राज्यशासनाच्या तिजोरीवर भार पडला असून उपत्न घटले आहे. तब्बल 75 हजार कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्याची मागणी असली तरी यावर्षी निधी मर्यादित स्वरूपात द्यावा लागेल,असे श्री पवार यांनी सांगतानाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज उद्योग आणि मोठे उद्योग आहेत. या कंपन्यांच्या कंपनी दायित्व निधी ग्रामीण भागात अंगणवाडी, वर्गखोल्या, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा इत्यादी मूलभूत सुविधा निर्मिसाठी उपयोगात आणावा असेही अजित पवार यावेळो म्हणाले.

या बैठकीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात 42 टक्के वनक्षेत्र असलेला चंद्रपूर जिल्हा असून वनपर्यंटनासोबतच वाघांचा वावर असलेल्या 139 गावांचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी या गावांना कुंपण देण्याची गरज आहे. त्यासाठी 147 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर यावर्षी जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, जिल्ह्यात वनपर्यटन वाढविण्यासोबतच मूलभूत सोई- सुविधांच्या निर्मितीसाठी, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणी पुरवठा इत्यादी बाबींसाठी एकूण 321 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईला बैठक घेऊन चर्चा करू आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे श्री पवार यांनी सांगितले. आज 70 कोटी अतिरिक्त निधी देऊन 250 कोटी रुपयांपर्यंत मान्यता देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी क्षेत्रनिहाय लागणाऱ्या अतिरिक्त निधीची कारणासाहित माहिती दिली. या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्री व्याहाळ तसेच सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleशिवसेना तर्फे नेत्र तपासणी व चश्मे वाटप कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here