पुन्हा एकदा वाघाचा थरार : एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : झरी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्‍या मांडवी बिट येथे सोमवारी (ता. ३१) पुन्हा एकदा वाघाचा थरार पाहायला मिळाला. एकाच्या मानेला पकडून ओढत नेले, तर दुसऱ्याला झाडावरून खाली ओढले. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून दुसरा थोडक्यात बचावला.

सुधाकर रामभाऊ मेश्राम (वय ३५) व रामकृष्ण कानू टेकाम (वय २२, रा. दोघेही बेलमपल्ली) हे दोघे बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले होते. यावेळी अचानक दोन्ही बैलांना वाघ दिसताच ते पळू लागले. यावेळी वाघाने अचानक सुधाकर आणि रामकृष्ण या दोघांवरही हल्ला चढविला. यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला. सुधाकरने कशीतरी स्वत:ची सुटका करवून घेतली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

वाघ त्याच्या मागे लागल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी रामकृष्ण हा झाडावर चढला. मात्र, वाघाने रामकृष्णच्या पायाला पकडून त्याला खाली ओढले. त्यामुळे त्याच्या पायाची बोटे पूर्णपणे कुरतडली गेली. दोघेही वाचवा वाचवा ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकून बैलगाडी घेऊन पाणी पाजण्यासाठी आलेले सहा ते सात शेतकरी मदतीला धावून आले. त्यानंतर वाघाने पळ काढला. त्यानंतर दोघांनाही प्रथम पांढरकवडा आणि नंतर यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.