सावली वन परिक्षेत्रांतर्गत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सावली वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील गेवरा खुर्द येथे पटेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवारी ( 1 सप्टेंबर 2021) रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. शालीक चापले (48) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सावली तालुका जंगल व्याप्त असून हिंस्र पशुचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात वाघाच्या हल्यात आतापर्यंत अनेक शेतकरी, पाळीव जनावरे ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने सदर शेतकरी हा आपल्या पत्नीसह शेतातील आंतर मशागतीचे कामे करण्यासाठी सकाळच्या सुमारास गेला होता.

शेतातील काम करीत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला चढविला. पत्नी ने आरडा ओरड करून वाघाला पळविन्याचा प्रयत्न केला परंतु वाघाने शेतकऱ्याला जंगलाच्या दिशेने फरफट घेऊन गेला. सदरची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी जंगलात येवून शोधाशोध केली असता सदर शेतकऱ्याचा मृतदेह चिखलात आढळून आला. सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. लागलीच वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येवून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळी यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक वासुदेव कोडापे करीत आहेत.

दिवसेंदिवस वाघाच्या संख्येत वाढ होत असून संगोपना करीता जंगल कमी पडत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर गावाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वन विभागाने त्वरित उपाय योजना करून हिंस्त्र पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.