चंद्रपूर व मुल येथील बस स्‍थानकांचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पोंभुर्णा येथील बस स्‍थानकाचे कंत्राट रद्द करण्‍याचा निर्णय

भाजपाच्‍या आंदोलनाच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आढावा बैठक

चंद्रपूर : जिल्‍हयातील चंद्रपूर, मुल आणि पोंभुर्णा येथील बस स्‍थानकांच्‍या बांधकामाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन मुंबई येथे आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर व मुल येथील बसस्‍थानकांचे बांधकाम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. तर पोंभुर्णा येथील बस स्‍थानकाचे कंत्राट कायमचे रद्द करून पुन्‍हा बांधकामाची निविदा प्रसिध्‍द करावी, असा निर्णय घेण्‍यात आला.

दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे चंद्रपूर येथील बस स्‍थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनाच्‍या संदर्भाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर आढावा बैठक घेतली. या बैठकीला म.रा. मार्ग  परिवहन महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शेखर चन्‍ने, महाप्रबंधक श्री. देसाई व अन्‍य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर बस स्‍थानकांच्‍या बांधकामाचा आढावा घेतला. मुल येथील बस स्‍थानकाचे बांधकाम अंतिम टप्‍प्‍यात असून फिनीशिंगचे काम सुरू आहे. बस स्‍थानकाच्‍या रंगरंगोटी काम शिल्‍लक असल्‍याची माहिती बैठकीत देण्‍यात आली. डिसेंबर २०२१ पर्यंत सदर बसस्‍थानकाचे बांधकाम पूर्ण करून जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर येथील बस स्‍थानकाचे फ्लोरींगचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून प्‍लॉस्‍टरींगचे काम पूर्ण झाले आहे. आसन व्‍यवस्‍था तसेच रंगरंगोटीचे काम शिल्‍लक आहे. निवासस्‍थानातील फ्लोरिंग व प्‍लंबींगचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून रंगरंगोटीचे काम शिल्‍लक आहे. ड्रेनेज लाईनचे काम सुध्‍दा बाकी आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत सदर कामे पूर्ण करून सदर बस स्‍थानक जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

पोंभुर्णा येथील बस स्‍थानकाचे बांधकाम मार्च २०२० पासून बंद आहे. काम पूर्ण करण्‍यासाठी मुदतवाढ देवूनही कंत्राटदाराने काम सुरू न केल्‍याने सदर कंत्राट रद्द करून पुन्‍हा निविदा प्रकाशित करण्‍याचा निर्णय बैठकीत घेण्‍यात आला.