चंद्रपुरात 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसिकरण

0
199
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सर्वसामान्याच्या कोरोना लसिकरणाची नोंदणी प्रक्रीया सुरू

• जिल्ह्यात 20 शासकीय व 7 खाजगी केंद्र सज्ज

चंद्रपूर : 60 वर्षातील सर्वसामान्य नागरिक आणि 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रीया आज सोमवार 1 मार्च 2021 पासून ऑनलाईन सुरू करण्यात आली असून जिल्ह्यात 20 शासकीय व 7 खाजगी असे 27 लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी को-वीन ॲप, आरोग्य सेतू ॲप किंवा https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही ॲप कोणत्याही प्ले स्टोअरवर उपलब्ध नसून त्याची लिंक डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. लस घेण्याकरिता आपल्या सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करता येणार आहे. एका मोबाईल क्रमांकावरून चार नावे नोंदविता येणार असल्याने ज्यांचेकडे मोबाईल नाही, त्यांना याचा लाभ होईल तसेच ज्या व्यक्तींना स्लॉट बुक करता येत नाहीत त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर आधार कार्ड, त्यांचा फोटो आयडी, पॅनकार्ड, ओळखपत्र घेऊन इतर फोटो ओळखपत्र दाखवून थेट लस मिळू शकते. शासकीय केंद्रात ही लस मोफत उपलब्ध असून खाजगी केंद्रात कोविड लसीच्या एक डोजकरिता 250 रुपये शुल्क ठरवून दिले आहे. त्यापैकी 150 रुपये त्यांनी शासनाकडे जमा करावयाचे असून 100 रुपये सेवा शुल्क म्हणून ठेवायचे आहे.

जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपूरी, गोंडपीपरी, जीवती, कोरपना, मूल, नागभीड, पोंभूर्णा, राजूरा, सावली, सिंदेवाही, वरोरा, ब्रम्हपरी, चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथील ग्रामीण रूग्णालय, चंद्रपूर जिल्हा रूग्णालय, चंद्रपूर महानगरपालीकेअंतर्गत रामचंद्र हिंदी प्रायमरी शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकुम, पोलीस रूग्णालय या वीस शासकीय केंद्रावर तसेच ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद कोवीड हॉस्पीटल, चंद्रपूर येथील संजीवनी हॉस्पीटल, क्राईस्ट हॉस्पीटल, बुक्कावार हार्ट ॲण्ड क्रीटीकल केअर हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, मुसळे चिल्ड्रन व मानवटकर हॉस्पीटल या सात खाजगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.