मुंबई : वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन जाहीर करणे तूर्तास टाळले असून आज त्यांनी राज्यात पूर्ण लॉकडाउनचा इशारा मात्र दिला आहे. सध्या लॉकडाउन जाहीर झाला नसला तरी राज्यात कडक निर्बंध लावणे गरजेचे असून त्याबाबतची नियमावली येत्या एक-दोन दिवसात जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. करोना रोखण्यासाठी काय करता येईल यासाठी पुढील काही दिवसांत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी, पत्रकारांशी संवाद साधून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकांनी नियमांची काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे सांगतानाच त्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नका, राजकारण करू नका अशी विरोधकांनाही हात जोडून विनंती केली आहे.
राज्यात लॉकडाउन लागू करणे हे घातक आहे याची मला कल्पना आहे. लॉकडाउन लागू केला तर त्याचा अर्थचक्रावर नक्कीच परिणाम होईल. पण असे केले नाही, तर करोना थोपवायचा कसा हा देखील प्रश्न आहे. एका विचित्र कात्रीत आपण सापडलो आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांनीही राजकारण न करता सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
केवळ लस घेणे, चाचण्या वाढवणे हा करोनाला हरवण्याचा उपाय नाही, असे सांगत असताना मात्र रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणी उपाय सांगत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.