आज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन

डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठानचे आयोजन

आज सायं ६ वा. दिव्यग्राम महोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळा

कोरपना (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबी तर्फे आज दिव्यग्राम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर कीर्तन होणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता चटप ले आऊट येथे कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमात गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार सत्यपाल महाराज व आश्‍वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी देण्यात येणारा सेवार्थ सन्मान विजय थेटे यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप रोख दहा हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ व ग्रामगीता असे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार एड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष संतोष उपरे, प्रमुख अतिथी प्राचार्य अनिल मुसळे, समाजसेवक डॉ गिरीधर काळे, सौ.सविता काळे व मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमास राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते, संपादक संतोष अरसोड, अधिवक्ता एड.दीपक चटप हे सत्यपाल महाराजांचा जीवन प्रवास मुलाखतीतून उलगडतील. त्यानंतर लगेच सत्यपाल महाराजांचे जाहीर प्रबोधन व कीर्तन होईल. मागील ९ वर्षांपासून बिबी येथे सेवार्थ ग्रुप व गावातील युवकांकडून दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक साजरी करण्यात येते.

महाराष्ट्रातील कृतिशील प्रबोधनकार म्हणून सत्यपाल महाराज सुपरिचित आहे. त्यांनी देशभर सामाजिक विषमतेविरुद्ध सप्तखंजिरीच्या माध्यमातून जनजागृती केली. बऱ्याच वर्षानंतर परिसरात सत्यपाल महाराज यांचे जाहीर किर्तन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर यातून जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी ‘सत्यपालची सत्यवाणी’ या प्रबोधनपर किर्तनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे अविनाश पोईनकर, रत्नाकर चटप, संदीप पिंगे, गणपत तुम्हाणे, हबीब शेख, विठ्ठल अहिरकर, राहूल आसूटकर, सतिश पाचभाई, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, इराणा तुम्हाणे, संतोष बावणे, गणपत मडकाम, मारोती मट्टे, सचिन मडावी, आकाश उरकुडे, महेश नाकाडे यांनी केले आहे.