विकृतीचा कळस, गर्भवती कुत्रीवर चंद्रपुरात अनैसर्गिक कृत्य

• आरोपीला अटक : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

चंद्रपूर : मोकाट गर्भवती कुत्रीवर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली. प्रकाश उर्फ विकास प्रभाकर डफ (३७) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.

शनिवारी रात्री चंदपूर – नागपूर रोडवर काही तरुण फिरत असताना त्यांना एक जण मोकाट कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याने दिसून आले. यासंदर्भात त्या तरुणांनी आरोपीला हटकले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तरुणांनी येथील प्यार फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच कुत्रीची वैद्यकीय तपासणी केली. ती गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तक्रार मिळताच रात्रीच रामनगर पोलिसांनी आरोपीवर ३७७ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इरपाचे यांच्यासह रामनगर पोलीस करीत आहेत.

अशा घटना आता चंद्रपूरसारख्या शहरात घडत असल्याचे दु:ख आहे. अतिशय नीच कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरात कठाेर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात असे करणाऱ्यांना धडा मिळेल.
: देवेंद्र रापेल्ली, अध्यक्ष, प्यार फाउंडेशन, चंद्रपूर