मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना लॉकडाउन जाहीर केला नसला, तरी देखील लॉकडाउनबाबतचे संकेत दिले होते. त्यावेळी राज्यातील करोनाच्या परिस्थितीवर बोलत असताना मी राज्याला पूर्ण लॉकडाउनचा इशारा देतो असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. करोनाला रोखायचे कसे याबाबत तज्ज्ञांशी बोलून लवकरच निर्णय घेणार असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर राज्याला सध्या लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारचे मत बनले असून आता सरकार केव्हाही लॉकडाउन घोषित करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासनानेही त्या दृष्टीने हालचाली करण्यास सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील. https://t.co/FCjPd5w861
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 2, 2021
कालच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना लॉकडाउन विरोधी पक्षांसह अनेक घटक राज्यात लॉकडाउन नको असे म्हणत आहेत. मात्र करोनाला रोखायचे कसे याबाबत कोणीच मार्ग सांगत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्यसुविधांचा आढावा देखील घेतला होता.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत राज्य सरकारने आरोग्यसुविधा वाढवल्या आहेत. टेस्टिंग सेंटर्स, बेड, रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा अशा सर्व सुविधा सरकारने वाढवल्या. अशा सुविधा आणखीही वाढवता येतील आणि आपण त्या वाढवू देखील. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पुरे पडतील इतक्या संख्येने डॉक्टर्स आणि नर्सेस आणायच्या कोठून असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या प्रश्नातून त्यांनी आता लॉकडाउनला पर्याय नसल्याचेच संकेत दिले होते.
मी लॉकडाउनचा इशारा देतोय- मुख्यमंत्री
मी राज्यात आज लॉकडाउन जाहीर करत नसलो तरी लॉकडाउनचा आज इशारा देत आहे, असे मुख्यमत्र्यांनी काल म्हटले होते. राज्यात संसाधने अपुरी पडू लागली असून जर करोना रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांमध्ये रुग्णालयांमधील बेड्स आणि साधने अपुरी पडतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते.