गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन
• पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 1193 नागरिकांना दिली लस
• कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवावे

चंद्रपूर : लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यातून कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांनी तसेच 45 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड,पोलीस उपअधिक्षक शेखर देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

45 वर्षावरील नागरिकांचे लसिकरण करतांना प्रत्येक केंद्रावर 60 टक्के ऑनलाईन नोंदणीद्वारे तर 40 टक्के थेट या समीकरणाद्वारे लसीकरण करावे. या 40 टक्के लाभार्थ्यांनाही टोकण देवून टाईम स्लॉट प्रमाणे सर्वांचे लसीकरण करावे व लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याबाबत केंद्रप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात 2 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून पहिल्या दिवशी 1193 नागरिकांना लस चा पहिला डोज दिला असल्याचे तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 44 हजार 981 डोज दिले असल्याची माहिती लसीकरण अधिकारी संदिप गेडाम यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांनी औषध साठा, रेमेडिसीवर इंन्जेक्शनचे वाटप, ऑक्सीजन साठा याबाबत माहिती घेतली तसेच कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांवर पोलीस विभागाने लक्ष ठेवून त्यांना विलगीकरणात पाठविण्याच्या सूचना दिल्या. मनपा व जिल्हा आरोग्य विभागाने ॲन्टीजेन कोरोना टेस्ट किट पर्याप्त मात्रेत साठा करून ठेवाव्या. तसेच जिल्हा स्त्री रूग्णालयात ऑक्सीजन बेडसाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तेथील सी-विंग तातडीने रिक्त करून घेण्याच्या सूचना अधिष्ठाता यांना दिल्या. बैठकीला डॉ. प्रकाश साठे, डॉ. अविष्कार खंडारे, डॉ.सुधीर मेश्राम, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. प्रतिक बोरकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.