उसगावच्या रस्त्यावर कोळसा वाॅशरीने पार्किंग व्यवस्था; रस्त्यावरील रहदारीला होत आहे अडचण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दोन महिन्यांपूर्वी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वाॅशरी सुरू झाल्यापासून प्रदूषण वाढले आहे. याशिवाय कोळसा भरलेले व खाली ट्रक उसगावच्या रस्त्यावर पार्किंग करीत असल्याने रस्त्यावरील रहदारीला अडचण निर्माण झाली असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील पार्किंग बंद करून कोळसा वाॅशरीने पार्किंग व्यवस्था आपल्या हद्दीत करावी, अशा मागणीचे पत्र उसगावच्या सरपंच निविता धनंजय ठाकरे यांनी वारंवार दिले. मात्र, पत्राची दखल घेतली नाही.

तत्काळ रस्त्यावरील पार्किंग बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या क्षेत्रातील विविध कोल वाॅशरीज मागील अनेक वर्षांपासून बंद होत्या. त्यापैकी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वॉशरी दोन महिन्यापासून सुरू झाली. दरम्यान, वाॅशरीच्या प्रदूषणामुळे व कोळसा वाहतुकीच्या वाहनामुळे आजूबाजूच्या शंभर एकर शेतजमिनीवरील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या वाशरीच्या कोळसा वाहतुकीच्या वाहनांच्या पार्किंगसाठी उसगाव-शेणगाव रस्त्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून इतर वाहनांच्या रहदारीला अडचण निर्माण झाली व अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

कोल वॉशरीने आपल्या हद्दीत ट्रक पार्किंगची व्यवस्था करावी, असे निवेदन उसगावच्या सरपंच निविदा ठाकरे यांनी गुप्ता वाॅशरीच्या व्यवस्थापनाकडे केली आहे. मात्र, अजूनही दखल घेतली नसल्याने वाहतुकीची समस्या अधिक वाढत आहे. वाॅशरीने तत्काळ ट्रक पार्किंग यार्ड बनवून रस्त्यावरील पार्किंग हटवावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.