8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं : BDO विरोधात FIR

बुलडाण्यात एक संतापजनक प्रकार घडलाय. संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात असलेल्या एका 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने स्वछता गृह साफ करून घेण्यात आलं आहे. यामुळे परिसरात प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

परवा बुलढाणा जिल्हाधिकारी संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मारोड या गावात येतील या भीतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश देण्यात आला.

गावात कुणीही नसल्याने चक्क प्रशासनाने या बालकाला या विलगीकरण कक्षाच्या स्वछता गृहाची साफसफाई करण्यासाठी 50 रुपयांचं आमिष दाखवलं. बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून अक्षरशः हाताने टॉयलेट साफ केलं. यावेळी विलगिकरण कक्षात 15 कोरोना बाधित रुग्ण हजर होते.

मारोड येथील अशोभनीय घटनेबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्यासह दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. या पीडित मुलाला न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी तामगाव पोलिसात बीडीओ आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.