“महाराष्ट्रात अजून Unlock केलेले नाही” – वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचे स्पष्टीकरण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु त्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असं अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात आलं.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं शासनानं स्पष्ट केलं आहे.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णया द्वारे स्पष्ट करण्यात येईल, असंही शासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी परस्पर घोषणा करून टाकली का?, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का?, सरकारमध्येच ‘अनलॉक’बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणं योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.