पीकपेरा नोंदणी ऑफलाइन करा : पारस पिंपळकर 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

चंद्रपूर : राज्य शासनाने सुरु केलेल्या पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ऑनराइड मोबाईलने  पार पडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ऑनराइड मोबाईल नाही. मोबाईल असणाऱ्यांना  माहिती नोंदविता येत नाही. एवढेच नाही, तर अनेक परिसरात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी पिपरीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी केली आहे.

राज्य शासनाने पीक पाहणी व पीक पेरा नोंदणी सुरु केली आहे. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही ऑनलाइन मोहीम राबविली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतीमालकाचे नाव, शेतीत घेतले जात असलेले पीक, मशागत करणाऱ्याचे नाव, गट क्रमांक, गावाचे नाव यासह अन्य माहिती नोंदवायची आहे. कर्जप्रकरण व अन्य सुविधांबाबत ही माहिती राज्य शासन विचारात घेणार आहे.

मात्र, शासनाने ही प्रक्रिया सुरु करताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडली आहे. आजघडीला ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे ऑनराइड मोबाईल नाही. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे. त्यांना माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेक परिसरात नेटवर्कचीही  समस्या आहे. त्यामुळेच  ऑगस्ट महिना लोटूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.  ऑनलाइन नोंदणी न करणारे शेतकरी भविष्यात अनेक योजनांपासून वंचित राहू शकतात.
शासकीय योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया ऑफलाइन राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळकर यांनी केली आहे. चंद्रपूरचे तहसीलदार नीलेश गौंड यांना निवेदन देताना कमलाकर निब्रड, विठ्ठल भोयर, महेंद्र बेरड, संदीप पिंपळकर, संजय तुराणकर, अतुल मोहितकर, विठ्ठल पिंपळकर, हरिओम पोटवले, सुरेश चौधरी, संतोष मत्ते, विनोद देवतळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

मशागतीच्या कामात नोंदणीचे टेन्शन

ग्रामीण भागातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कापूस, सोयाबीन व अन्य पिके फुलोऱ्यावर आहेत. त्यामुळे फवारणी, खत देणे अशी अनेक कामे शेतकरी करीत आहेत. अशात आता राज्य शासनाने ऑनलाइन पीक पाहणी व पीक पेरा नोंदणी प्रक्रिया सुरु केली. ३० सप्टेंबर पर्यंत माहिती नोंदविणे अनिवार्य केले. त्यामुळे शेतीची कामे सोडून ही माहिती भरण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यातही  ऑनराइड मोबाईल नसणाऱ्या शेकऱ्यांसमोर मोबाईल कुठून आणायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया

शेतकऱ्यांना स्वतःच्या ऑनराइड मोबाईलने  पार पडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ऑनराइड मोबाईल नाही. मोबाईल असणाऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती नोंदविता येत नाही. अनेक परिसरात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवावी. – पारस पिंपळकर, माजी सरपंच तथा विद्यमान  सदस्य ग्रामपंचायत पिपरी (जि. चंद्रपूर)