विद्यार्थ्यांनी बसपुढे मांडला अर्धा तास ठिय्या

0
156
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• लाठी विद्यार्थी बसची सुविधा नसल्याने संताप

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील लाठी येथे परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र , या विद्यार्थ्यांना ये – जा करण्यासाठी बसची सुविधा नाही. परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेकदा मागणी केली. मात्र , या मागणीची गंभीरतेने दखल घेतली जात नाही. अखेर, संतापलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बससमोर ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठांनी याप्रकरणात तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर अर्धा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लाठी येथे बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे.

त्यामुळे परिसरातील वेडगाव, सोनापूर व अन्य गावांतील विद्यार्थी येथे अकरावी, बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येतात. लाठी येथे जाण्यासाठी पहाटेच्या सुमारास एक बस आहे. मात्र, सुटी झाल्यानंतर गावाकडे परत जाण्यासाठी बसची सुविधा नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने गावाकडे जावे लागते. खासगी वाहनाने दररोज ये – जा करणे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही. ही बाब ओळखून पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य दीपक सातपुते यांनी विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहन उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी या मार्गाने बसची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा निवेदनातून केली आहे. मात्र, परिवहन महामंडळाचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बसपुढे ठिय्या आंदोलन करीत अर्धा तास बस रोखून धरली. या प्रकाराची माहिती मिळताच लाठीचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांनी | घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ठाणेदार राठोड यांनी परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनीसकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.