चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि जिवती येथे स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला खासदार बाळू धानोरकर यांनी आज (दि.४ ला) भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. प्रशासनाला रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेतील गैरसोयी दूर करण्याचे यावेळी सूचना केल्या.
गडचांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ७६ रुग्ण उपचार घेत आहे. प्रत्येक महिला व पुरुष रुग्णांची खासदार बाळू धानोरकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी समजून घेतल्या. रुग्णांच्या मागणीनुसार भोजन व्यवस्थेच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. अनेक रुग्णांनी तिथे असलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे राजुरा, कोरपना आणि जिवती येथील देखील कोविड सेंटरला भेट दिली. तेथील आरोग्य यंत्रणेच्या आढावा त्यांनी घेतला.
यावेळी राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, तहसीलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी ओम रमवत, वैद्यकीय अधिकारी कुळमेथे, प्रकाश नागराळे, अशोक जाधव , गडचांदूर च्या नगराध्यक्ष सविता टेकाम, तहसीलदार महेंद्र वाकलेकर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गेडाम, नारंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील टेंभे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, आरोग्य सभापती राहुल उमरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे, माजी अध्यक्ष रोहित शिंगाडे, अतुल गोरे यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते