आंबेडकर चळवळीचे नेते मुकुंद खैरेंचे कोरोनाने निधन; आठ दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अकोला : समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील नेते अॅड. प्रा. मुकुंद खैरे (६३) यांचे आज (दि.०५) सकाळी अकोला येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आठ दिवसांत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त होत आहे.

प्रा. मुकुंद खैरे अनेक दिवसांपासून कोरोनाशी लढा देत होते. त्यांची पत्नी व मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. गेल्या आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे निधन झाले. यानंतर प्रा.खैरे यांच्यावरही काळाने झडप घातली. मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राज्य शास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

६ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी समाज क्रांती आघाडी स्थापन केली. राज्य घटनेचे ते गाढे अभ्यासक होते. अनेक आंदोलने करुन शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला. दहा वर्षांपासून विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवली. आदिवासींचे प्रश्न लावून धरले. पत्नी छाया खैरे, मुलगी शताब्दी आणि आता प्रा. मुकुंद खैरे यांच्या निधनाने कुटुंबावर काळाने आघात केला.