चंद्रपूर जिल्ह्यात आणखी तीन जंगल सफारी सुरू होणार

0
462

◾सिंदेवाही, राजुरा आणि चोरा या तीन क्षेत्रांची निवड
◾मार्च महिन्यात सफारीचा मुहूर्त

चंद्रपूर : पट्टेदार वाघ, काळा बिबट आणि विविध प्राण्याच्या वास्तव्यामुळे जगभरातील पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या ताडोबा अभयारण्यासोबतच प्रादेशिक वनात आता नव्याने तीन ठिकाणी जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे ताडोबासोबतच विविध क्षेत्रातील पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या करिता शिंदेवाही, राजुरा आणि चोरा या तीन क्षेत्रांची निवड करण्यात आली असून लवकरच जंगल सफारीचा शुभ मुहूर्त होणार आहे.

विदर्भातील ताडोबा अभयारण्य वाघांच्या प्रजनन आणि वास्तव्याकरिता सुरक्षित असे स्थान आहे. या अभयारण्यात पट्टेदार वाघ, विविध प्राणी आणि आता काळा बिबट्याच्या वास्तव्यामुळे ताडोबा अभयारण्याची ओळख जगाच्या नकाशावर झालेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी राजकीय नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींची पर्यटनाकरिता वारंवार “वारी” होत असते.
ताडोबा अभयारण्यातील गर्द जंगल आणि विपुल प्राणी विश्वासोबतच प्रादेशिक वनांतील नव्या तीन जंगल सफारीच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद द्विगुणित करण्याची संधी वन विभागाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्याने सिंदेवाही, राजुरा आणि चोरा अशा तीन क्षेत्रांची निवड करण्यात आली असून, पुढील महिन्यात सफारी इथं सुरू होणार आहे.
या तिन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघासोबतच इतर वन्यजीव आहेत. त्यामुळे या तिन्ही सफारी पर्यटकांना पर्वणी ठरणार आहेत.

शिवाय ताडोबाच्या पर्यटनातून स्थानिकांना जसा रोजगार उपलब्ध झाला, तसाच रोजगार या नव्या सफारीच्या ठिकाणी पण होणार आहे. पर्यटनातून रोजगार निर्मिती हा मोठा उद्देश यामागे आहे. नुकतेच प्रायोगिक तत्वावर चंद्रपूरलगत कारवा जंगलात २६ जानेवारीपासून सफारी सुरू करण्यात आली आहे. त्याला पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने आता नव्या तीन क्षेत्रात सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.