• अल्ट्राटेक प्रशासनाकडे ५० बेडसाठी पाठपुरावा
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना ग्रामीण स्तरावर स्वतः पुढाकार घेत नांदा ग्रामपंचायतीने १५ बेडचे कोव्हिड विलगीकरण केंद्र उभारले आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री रविंद्र लालजी श्रीवास्तव यांनी या विलगीकरण कक्षासाठी २५ हजार रुपयांचे १० बेड दिले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप यांनी दिली.
नांदा येथील नागरिकांना कोरोनाचे उपचार तातडीने मिळावे आणि कोणत्याही ग्रामस्थास नाहक जीव गमवावा लागू नये यासाठी कोव्हिड विलगिकरण केंद्र तयार केले. ग्रामपंचायत प्रशासन इतक्यावरच न थांबता येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते हे लक्षात घेऊन सेवाभावी संस्था व कंपन्यांना मदतीचे आव्हान करत आहे. नांदा गावालगत असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माध्यमातून ५० बेड, वैद्यकीय सुविधा व रुग्णांना जेवणाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांशी आमचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच गणेश पेंदोर यांनी दिली.
नांदा गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ बेडचे कोव्हीड विलगीकरण केंद्र तयार झाले असून १० बेडसाठी सहकार्य करणाऱ्या श्री. रवींद्र श्रीवास्तव यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी आभार मानले. तर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी पंढरी गेडाम म्हणाले की, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून तिसऱ्या लाटेसाठी आतापासून सज्ज होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी बाळगण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराने गावकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.