घुग्घुस : येथील जिल्हापरिषद प्राथमिक कन्या शाळा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार आज गुरुवारी 6 मे रोजी पासून 18 ते 44 वर्षाच्या वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले.
परंतु ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांनी तसेच इतर शहरातील नागरिकांनी या केंद्रात मोठी गर्दी केली, त्यामुळे घुग्घुस परिसरातील नागरिक मागे पडले हे चित्र बघून स्थानिक घुग्घुस वासियात तीव्ररोष निर्माण झाला.
सध्या घुग्घुस परिसरात कोविड रुग्णांची संख्या व मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे लसीकरणासाठी स्थानिक घुग्घुसचे नागरिक या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यासाठी धाव घेत आहे.
या केंद्रातून कोविड लसीकरणासाठी गेलेल्या स्थानिकाना मोठी गर्दी होत असल्याने परत जावे लागत आहे.
ही समस्या लक्षात घेत घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या केंद्रावर स्थानिक घुग्घुस वासियांना प्राधान्य मिळण्यासाठी हे लसीकरण केंद्र फक्त घुग्घुस वासियांना करिता उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.