चंद्रपुरात हल्दीराम रेस्टोरेंट, उत्सव लॉन, कोचिंग सेंटर कारवाई

0
429

• कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात मनपा आक्रमक

चंद्रपूर : शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन,इंस्पायर कोचिंग क्लासेस , इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तसेच हल्दीराम रेस्टोरेंटला ५ दिवस बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे. मनपा पथकामार्फत झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी सुरु असताना उत्सव लॉन येथे लग्न कार्य सुरु असल्याचे आढळून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लॉन मालकास दंड करण्यात आला.
हल्दीराम रेस्टोरेंटचे काही कर्मचारी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले होते त्यामुळे मनपा आरोग्य विभागाद्वारे त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले होते मात्र चाचणी न करताही कर्मचारी कामावर आढळुन आल्याने दंड तसेच ५ दिवस रेस्टोरेंट बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली.

शिकवणी वर्ग (कोचिंग सेंटर) बंद ठेवण्याचे आदेश असतांना इंस्पायर कोचिंग क्लासेस , इनसाईट कोचिंग क्लासेस व इतर कोचिंग मालकांनी शिकवणी वर्ग सुरु ठेवले तसेच येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आढळून आल्याने व कुठेही सोशल डिस्टनसिंग चे पालन केले नसल्याने सर्व शिकवणी वर्गांकडुन दंड वसुल करण्यात आला तसेच त्यांना समज देण्यात आली.
लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे कोरोनाविषयक बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा व प्रसंगी सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार प्रशासनद्वारे कारवाई करण्यात आली आहे. कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, डॉ. अश्विनी भारत, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुध्दे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे उपस्थित होते.