• मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू , उद्या रविवारी लागणार शिबीर
चंद्रपूर : सावली तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. कोरोनाच्या भितीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. गावातील ७० टक्के लोक आजारी आहेत. दरम्यान आज शनिवारी शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. आठवडाभरात तिघांचा मृत्यू झाला आहे.
सावली तालुक्यातील मेहा बु. हे गाव गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने फणफणत आहे. तापाच्या साथीने गावातील एकाचा पहिला बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याची व्यवस्था नाही. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची प्रचंड साथ आली असून, सर्व घरांमध्ये तापाचे रुग्ण आहेत. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने भीतीपोटी अनेकजण कोरोना चाचणी करण्यास पुढे आलेले नाही. काही तरुणांनी स्वतःहुन चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. गावात चाचणी शिबीर लावण्याची गरज आहे. ताप असल्याने अनेकांनी कोरोनाची लसदेखील घेतलेली नाही. हीच परिस्थिती शेजारच्या गावात आहे.
या आठवड्यात आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. गावातील ३ जण दगावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी दिली आहे. अंतरगाव, निफंद्रा, गेवरा, मेहा येथील सर्व साधारण पॉझिटिव्ह रुग्णांसाठी निफंद्रा येथील आडेपवार हायस्कुल येथे विलिगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे.