झोलाछाप डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• इंटरनेटवर विविध व्याधींवरील उपचार पद्धती बघून आणि पुस्तके वाचूनकरत होता उपचार

नागपूर : १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करताच अगदी थाटात दवाखाना टाकून तिथे गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या एका झोलाछाप डॉक्टरला नागपूरच्या नवीन कामठी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंदन नरेश चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून तो इंटरनेटवर विविध व्याधींवरील उपचार पद्धती बघून आणि पुस्तके वाचून गरीब रुग्णांवर उपचार करत असल्याचा खुलासा झाला आहे. एवढंच काय तर हा बोगस डॉक्टर नर्सिंगचे देखील प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याच्या दवाखान्यातून ऑलोपॉथिक औषधीचा साठा आणि उपकरणे जप्त केली आहेत.

सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना बहुतांश दवाखाने रुग्णांच्या गर्दीने भरलेले दिसून येत आहे. त्यातच नवीन कामठी पोलिसांना चंदन चौधरी संदर्भात अनेक तक्रारी मिळू लागल्या असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान त्याच्या दवाखान्यात कोरोनावर उपचार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येतात पोलिसांनी या धर्मार्थ दवाखान्याला भेट दिली. संचालक चंदन नरेश चौधरी यांच्या जवळ वैद्यकिय व्यवसायासाठी आवश्यक महाराष्ट्र मेडीकल कौन्सलिंग नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही, तरी देखील आरोपी हा वैद्यकीय व्यवसाय करत होता. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि सहकलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय कायदा अन्वये गुन्हा नोंदविला असून त्याला अटक करण्यात आली आहे.