अग्रलेख | करोना ओसरतोय!

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
देशातील करोना स्थितीबाबत दरररोज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जी आकडेवारी दिली जाते, त्यात देशाचे बहुतांशी विषयीचे चित्र स्पष्ट होत असते. आज जाहीर करण्यात आलेली करोनाबाधितांची आकडेवारी लोकांमध्ये दिलासा निर्माण करणारी ठरली आहे.
आज करोनाबाधितांचा आकडा केवळ 1 लाख 626 इतका आढळून आला आहे. गेल्या 61 दिवसांतील हा नीचांकी आकडा आहे. त्यामुळे करोनाची ही दुसरी लाट ओसरू लागल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहेत. पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला असून तो आता केवळ 6 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे, सक्रिय बाधितांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. ही सुलक्षणे मानली पाहिजेत. एप्रिल आणि मे महिन्यात या महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतवासीयांचा अक्षरश: अंत पाहिला आहे. काय करावे, हे कोणालाच सूचत नव्हते. केंद्र सरकार तर या लाटेत पूर्ण हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. करोना नियंत्रणाची सारीच जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवून सरकार नामानिराळे राहिलेले पाहायला मिळाले.
बेड्‌स, ऑक्‍सिजन, इंजेक्‍शन्स, औषधे या साऱ्याचीच देशभरात कमतरता असल्याने सगळ्यांचीच जीवघेणी धावाधाव झाली. याच्या कहाण्या अजूनही लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. त्या स्मृतींचे व्रण देशवासीयांच्या मनात कायमचे कोरले गेले आहेत. ते इतक्‍यात पुसले जाण्याची शक्‍यता नाही. लोकांच्या सहनशीलतेचा अंत या महामारीच्या दुसऱ्या लाटेने पाहिला. यातून कधी बाहेर पडू याची काळजी सगळ्यांनाच लागली होती. पण आता दिलासाजनक स्थिती निर्माण झाली आहे. ऑक्‍सिजन आणि बेड्‌सच्या तुटवड्याच्या बातम्या आता दिसेनाशा झाल्या आहेत. गंगेच्या पात्रातून वाहत येणारी प्रेतेही जवळपास बंद झाली आहेत. हे जरी खरे असले आणि लाट ओसरल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असली तरी अजूनही रोज नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या लाखापेक्षा अधिक आहे, हेही विसरता येणार नाही. पूर्णपणे निर्धास्त व्हावे अशी स्थिती अजून निर्माण झालेली नाही.
विदेशातील लोक मात्र आता मास्क न लावता हिंडू लागले आहेत. तेथील सार्वजनिक वावरावरील सर्व निर्बंध काढून टाकले गेले असून तेथे फुटबॉल स्पर्धा आणि रॉकचे कार्यक्रम पहिल्यासारखे सुरू झाले आहेत. लोकांना एकमेकांना अलिंगन द्यायला अनुमती दिली गेली आहे. युरोप आणि अमेरिकेत रस्त्यावर बियरचा आस्वाद घेत ही मंडळी मुक्‍तपणे हिंडत असतानाचे फोटोही झळकू लागले आहेत. अर्थात, त्या देशांमध्ये इतका मोकळेपणा लसीकरणामुळे आला आहे. पण भारतातील लसीकरण मात्र अजूनही अत्यंत संथ गतीनेच सुरू आहे. भारतातही 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असते तर एव्हाना आपणही इतका मुक्‍त श्‍वास घेऊ शकलो असतो. पण अजून एवढे सुख आपल्याला उपलब्ध नाही.
लसीकरणाचे काम कधी वेग धरणार याचाही अजून काही अंदाज लागताना दिसत नाही. सरकारच्या दोन मंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत सारे लसीकरण पूर्ण करू, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली असली तरी आता सरकारी घोषणांवर डोळे झाकून विश्‍वास ठेवण्याची कोणाचीच तयारी नाही. जेव्हा हे लसीकरण पूर्ण होईल तेव्हाच ते खरे मानता येईल. भारतात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाची मोहीम सुरू झाली आज त्याला सहा महिने होत आले आहेत. पण अजून जेमतेम 23 कोटी लोकांनाच हे डोस दिले गेले आहेत. त्यातील अनेकांना अजून दुसरा डोसही मिळायचा आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत किंवा डिसेंबरअखेरपर्यंत देशातील लसीकरणाचे काम पूर्ण होईल यावर सहजी विश्‍वास ठेवता येत नाही.
लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. पण लस उपलब्ध करण्याचे काम केंद्र सरकारच्या नियंत्रणात आहे. हे नियंत्रण जोपर्यंत काढले जात नाही तोपर्यंत लसीकरणातील घोळ संपण्याची शक्‍यता नाही, असे सर्वांचेच म्हणणे पडले. राज्य सरकारांनी लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी आपली सारी शक्‍ती पणाला लावली आहे. यंत्रणा आणि कर्मचारी सिद्ध ठेवले आहेत, पण त्यांच्यावर आजही अनेक ठिकाणी लस उपलब्ध नाही, असे फलक लावण्याची वेळ येते. ती परिस्थिती कधी सुधारणार हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे याविषयी स्पष्टीकरण मागवले आहे. पण ते अजून मिळायचे आहे. लसीच्या किमतीचा घोळही अजून संपलेला नाही. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी सायंकाळी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना लसीकरणाचे काम पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात घेऊन देशवासीयांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. ही लसीकरणाची कहाणी जेव्हा यशस्वी होईल तेव्हा होवो, पण आज मात्र करोना नियंत्रणात येत आहे यासारखी दुसरी चांगली बातमी नाही.
दुसरी लाट अजून पूर्ण आटोक्‍यात यायच्या आतच राज्य सरकारांनी आता तिसऱ्या लाटेसाठी जय्यत तयारी ठेवली आहे याच्या बातम्याही येत आहेत, त्या दिलासा देणाऱ्या आहेत. तिसरी लाट येणारच आहे हे बहुतांशी राज्य सरकारांनी गृहीत धरले आहे. त्याचे आतापासूनच नियोजन सुरू असल्याने तिसऱ्या लाटेत आता पुन्हा लोकांना ऑक्‍सिजन, बेड्‌स आणि औषधांसाठी धावाधाव करावी लागणार नाही, असे चित्र निर्माण होते आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रासारखी राज्ये यासाठी सर्वात पुढे आहेत. तिसऱ्या संभाव्य लाटेची गाज आता बालकांवर पडणार असल्याची भाकितेही अनेक तज्ज्ञांनी केली आहेत. त्यामुळे बालकांसाठी महाराष्ट्रात आधीपासूनच वेगळ्या बेड्‌सचे आरक्षण केले जात आहे.
महाराष्ट्राने त्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे स्वतंत्र टास्कफोर्सही निर्माण केले आहे. तिसरी लाट येईल तेव्हा येईल पण आज तरी आपण दुसऱ्या लाटेतून सुखरूपपणे बाहेर पडले पाहिजे. म्हणजेच अजूनही पुरेशी काळजी घेऊनच आपण वावरले पाहिजे. या साऱ्या धावपळीत म्युकरमायकोसिसच्या नव्याच आजाराने डोके वर काढले आहे. त्याच्याही औषधांचा आता तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्याचीही धास्ती कायमच आहे. मनुष्याच्या पाठी हे काय शुक्‍लकाष्ट लागले आहे, त्याचा उगम कोठून झाला आणि आता आपल्याला यातून पूर्ण मुक्‍तता कधी मिळणार, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे वैज्ञानिकांचे प्रयत्नही सुरू आहेत.
माणसाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीला आव्हान देणारा काळ असा अचानक उभा ठाकतो. पण माणसाच्या वैज्ञानिक संशोधनातून त्याला उत्तरेही शोधण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे या वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञांच्या कामाला आपण सलामच केला पाहिजे, त्यांच्याविषयी आपण कायम कृतज्ञच राहिले पाहिजे.