सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यामुळे भाजपच्या ट्विटर सेनेची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे आता भाजपला ट्विटरचे ओझं झालं आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात भाजपने नैपुण्य प्राप्त केलं होतं. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता, अशी टीका शिवसेनेनं केलीये.