• उद्या सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज
• आमदार किशोर जोरगेवार यांनी केली रुग्णालयाची पाहणी
• रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या सुचना
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय उद्या सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्या अशा सूचना केल्या आहे. यावेळी नोडल ऑफिसर रोहन घुगे, बांधकाम विभागाचे अभियंता रोठोड यांच्यासह माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल तसेच रुग्णालयीन सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड रुग्णालयासाठी मनपाला दिलेला स्थानिक आमदार विकास निधीतील एक करोड रुपये आणि काही उद्योगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे 100 खाटांच्या ऑक्सिजन युक्त कोविड रुग्णालयाचे काम सुरु करण्यात आले होते. या कामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूर महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपूरावा सुरु होता तसेच या कामाकडे आमदार किशोर जोरगेवार यांचे लक्ष होते. मागील आठवडाभरापासून त्यांच्या वतीने सदर ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केल्या जात होती. येथील काम युध्द स्तरावर पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर अतिशय कमी वेळात या रुग्णालयाचे काम पुर्ण झाले असून उद्या सोमवारपासून हे रुग्णालय कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास सज्ज होणार आहे.
येथे 115 खाटा असून यातील 100 खाटा ह्या ऑक्सिजनयुक्त असणार आहे. दरम्याण आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा सदर रुग्णालयाला भेट देत अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी कोविड रुग्णांकरिता विक्रमी वेळेत सोई सुविधा युक्त रुग्णालय तयार केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही हे रुग्णालय लवकर सुरु व्हावे याकरिता शिताफिचे प्रयत्न केलेत. या रुग्णालयाला तात्काळ प्रशासकीय मान्यता देत रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया गतिशील करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच त्यांनी सदर रुग्णालयाची पाहणी करत येथील कामाचा आढावा घेतला होता. सध्या ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामूळे आॅक्सिजन युक्त 100 खाटांचे हे रुग्णालय सुरु होताच रुग्णांची ऑक्सिजन बेड अभावी होत असलेली मोठी गैरसोय टळणार आहे.
अशी आशा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. ह्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था रूग्णालयातर्फे करण्यात येणार आहे. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातलगांना देण्याची यंत्रणा असणार आहे. येथील सर्व वार्डमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून सी.सी.टीव्ही च्या निगराणीत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. यापूर्वीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेड संख्या वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न केले होते.