कोरोना रुग्ण-नातेवाईकांना रोज फळ आणि भोजनदान

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोना ने हाहाकार माजला असून बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांचे फार हाल होत आहेत. अन्न, पाणी आणि पौष्टीक आहारा वाचून रुग्णांची मोठी परवड होत आहे. हे लक्षात येताच मिशन अभिनव चंद्रपूर, ध्येय इन्स्टिट्यूट(IIT-JEE/NEET/MH-CET) आणि मित्र मंडळच्या मानवीय संवेदना जाग्या झाल्या. यंग चांदा ब्रिगेड आणि ज्येष्ठ विधीज्ञ विजय मोगरे यांच्या मार्गदर्शनात ध्येयवेड्या तरुणांनी मग रोज विविध कोविड रुग्णालयात मोफत फळ, बिस्कीट आणि अन्न दान सेवा सुरू केली आहे.

गेल्या १ मे पासून ही सेवा अव्याहत सुरू असून अॅड. राम मेंढे, अॅड. राहुल मेंढे, रुबिना मिर्झा, आशिष भडके, कृष्णा चिंचोलकर, संदीप, सागर वानखेडे, चिंटू वानखेडे आणि सतीश मांडवकर यांनी गरजू आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीत असलेल्या रुग्ण तसेच नातेवाईकांना प्रत्यक्ष या सेवेचा लाभ देण्याचा ध्यास घेतला आहे.

सरकारी दवाखाना, मेडिकल कॉलेज, डॉ. झाडे, डॉ. पंत, मांनवटकर आणि डॉ. पोटदुखे यांच्या कोविड रुग्णालयात रोज ही सेवा प्राध्यान्य क्रमाने गरजू पर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जात आहे. रोज किमान शंभर लोकांना याचा लाभ होत असल्याची माहिती, अॅड. राम मेंढे यांनी दिली. या सेवेत सामील होणाऱ्याचे स्वागतच असून ते कुठल्याही रुपात यात योगदान देऊ शकतील असे ते म्हणाले.