• दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा संशय
• शवविच्छेदन अहवालानंतर कळणार मृत्यूचे कारण
चंद्रपूर : वेकोलि मध्ये काम करणाऱ्या एका 32 वर्षीय कामगाराचा मृतदेह आज रविवारी (9 मे) ला घुग्घूस वेकोलि वसाहतीच्या गांधीनगर क्वार्टर नंबर 141 मध्ये दुपारच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. युवकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय असून तेव्हापासून मृतदेह घरीच पडून होता. देवदास प्रेमदास उटला (32) मृत युवकाचे नाव आहे. सदर युवकाच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लावले जात असले तरी शवविच्छेदन अहवालानंतर युवकाच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.
सदर युवक हा निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत आहे. मागील दोन महिन्यापासून घुग्घुस वेकोली वसाहतीच्या गांधी नगर क्वार्टर नंबर 141 मध्ये एकटाच राहत होता. त्याच्या पश्चात आई आणि बहिण आहे परंतु ते बरेच दिवसांपासून तेलंगाना येथे गेले आहेत. त्यामुळे तो सध्या एकटाच वास्तव्यास होता.
मागील दोन दिवसांपासून तो घरी बाहेर निघताना दिसून आला नव्हता त्यामुळे शेजा-यांनी दुपारच्या सुमारास त्याचे घरी पाहिले असता मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून प्राप्त होणा-या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच सदर युवकाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
सध्या कोरोनाचे सर्वत्र थैमान असल्याने वाटेल त्या ठिकाणी नागरिकांचे औषधोपचाराअभावी जीव जात आहेत. त्यामुळे युवकाच्या मृत्यूबाबतही विविध शंका उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन आवाहनानंतर सदर युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते कळणार आहे.
या घटनेचा तपास सहा.पो.नि. मेघा गोखरे, पो. हवा. योगेश शार्दूल व मंगेश निरंजणे करीत आहेत. यांनी घटनास्थळ गाठून पंचनाम केला.