मृत्य झालेल्या रुग्णावरील औषधौपचाराचा पूर्ण खर्च केला माफ

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घेतला निर्णय

• डॉ. चेतन खुटेमाटे यांचे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

चंद्रपूर : विनापरवानगी कोरोनाबाधितांवर उपचार… रेमडेसिव्हीरचा काळाबाजार… रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली.. आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली आहेत,असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होताना दिसत आहेत. डॉक्टरातील ”देवमाणूस” अद्यापही जागा आहे, असीच एक सुखद घटनाही घडत आहेत. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे. पैशासाठी मृतदेहांनाही कुलूप बंद करणा-या डॉक्टरांच्या गर्दी डॉ. खुटेमाटेंनी त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाइकांना उपचाराची पूर्ण रक्कम परत करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. ही पहिलीच वेळ नाही, नेत्रतज्ज्ञ असलेले खुटेमाटे अनेक गरजवंताच्या शस्त्रक्रिया एक पैसाही न घेता नेहमीच करून देत असतात.

डॉ. चेतन खुटेमाटे शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:च्या नेत्र रुग्णालयाला चक्क कोविड हॉस्पिटल बनविले. डॉ. सचिन धगडी हे येथे सेवा देत आहेत. आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या छोटा नागपूर येथील एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती डॉ. खुटेमाटेंच्या कानावर आली. सामाजिक पिंड असलेल्या डॉ. खुटेमाटे यांनी कोणताही विचार न करता त्या रुग्णाचे संपूर्ण उपचाराचा खर्च माफ केला. एवढेच नाही, तर भरतीपूर्व घेतलेली रक्कमही नातेवाइकांना परत केली. डॉ. खुटेमाटेंच्या या निर्णयाला त्यांचे सहकारी डॉ. सचिन धगडी यांनीही क्षणात होकार दिला. डॉक्टर यांच्या या कृतीपुढे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांसमोर केवळ हात जोडण्याव्यतिरिक्त काहीच नव्हते.

या प्रसंगाने रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. खुटेमाटे यांच्या मनातील तळमळ, गोरगरीबांविषयीची असलेली आस्था जवळून बघता आली. त्यांच्या प्रमाणेच अन्य डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. संकटकाळात सर्वांनी सेवाभावी भाव दाखवावा. जेणेकरून डॉक्टरांविषयीचे तयार झालेले गैरसमज दूर होऊन पुन्हा डॉक्टर हेच देवदूत असल्याचा विश्वास निर्माण करता येईल.

डॉ. चेतन खुटेमाटे यांचे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले आहेत. गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. अनेकांकडे पैशाची अडचण असल्यास मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर आस्थेने विचारपूस करीत गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या हातात पैसेसुद्धा घालतात. यासोबतच गावखेड्यात ते नियमितपणे आरोग्य शिबिरे घेत असतात. आपल्या ज्ञानाचा फायदा गावखेड्यातील नागरिकांना व्हावा, एवढीच त्यांची इच्छा असते. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या अनेक युवकांना त्यांनी आजपर्यंत मदतीचा हात दिला. यातून अनेक युवक आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करू शकली. केवळ सेवाभाव म्हणून काम करणारे डॉ. खुटेमाटे कायम प्रसिद्धीपासून दूर राहतात हा त्यांचा मोठेपणा आहे.