आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मनपा वसूल करणार 1200 रुपये दंड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार; विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई

चंद्रपूर : सध्या कोरोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी आता २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. विनामास्क फिरत असतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोव्हीडचे विषाणू हवेत पसरून रोगराई पसरण्याची भीती असते. कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. मास्कमुळे विषाणूचा फैलाव नियंत्रणात येईल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगर पालिका कठोर पावले उचलणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना कायदेशीर तरतुदीनुसार केवळ २०० रुपयांऐवजी १२०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ रोजी दिल्या होत्या. मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करणे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.