• दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे पप्पू देशमुख यांचे आवाहन
चंद्रपूर : सामान्य रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे सुहास पानबुळे यांना नुकतेच मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले. 7 महिन्यांच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी मागील चार महिन्यापासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनात पाणबुळे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अशातच दहा दिवसापूर्वी त्यांना मुखातील कॅन्सरचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यामुळे त्यांना नागपूर येथील कोलंबिया रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचेवर तीन दिवसापूर्वी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्यामुळे पाणबुळे परिवारावर नवीन संकट ओढवले आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता कोलंबिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण गंटावार यांनी वाजवी दरामध्ये शस्त्रक्रिया करण्याचा शब्द दिला. एका वेळी तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांचेवर रेडिओथेरपी, किमोथेरपी या उपचारांची गरज आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जन विकास सेनेचे भुषण फुसे यांनी नागपूर येथिल कोलंबिया रुग्णालयात जाऊन सुहास पानबुळे व त्यांच्या पत्नीकडे 21 हजार रुपये मदतीचा धनादेश दिला. फुसे यांच्या मदती बद्दल डेरा आंदोलनातील सर्व कामगारांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे डेरा आंदोलनातील इतर कामगारांप्रमाणे पाणबुळे यांचे ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत 7 महिन्यांचे पगार थकित आहेत. इतर शेकडो कामगारांप्रमाणे त्यांचेही कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झालेला असतांना त्यांना कर्करोगाने गाठले. मात्र डेरा आंदोलनतील सर्व कामगार व जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आजाराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक तणावामुळे व उपचाराअभावी 3 कामगारांचा जिव गेल्यावर व कामगारांची मुले अनाथ होऊनही शासनाने थकीत पगार दिलेले नाही. आता एका कॅन्सरग्रस्त कामगाराचे 7 महिन्यांचे पगार शासनाकडे थकित असतांना कामगाराकडे उपचारासाठी पैसे नाही.महाविकास आघाडी सरकार व शासनातील भ्रष्ट-मुजोर अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे. त्यामुळे सुहास पानबुळे यांचेवर उपचार करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन डेरा आंदोलनाचे नेतृत्व करणारे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेले आहे.